ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक (मराठी )
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे |
तेथें तर्क संपर्क तोही न साहे |
अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें |
दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें || १९९ ||
कळे आकळे रूप तें ज्ञान होतां |
तेथें आटली सर्व साक्षी अवस्था |
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे |
तो गे तो चि राम सर्वत्र पाहे || २०० ||
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना |
मनीं मानसीं व्दैत कांही वसेना |
बहूतां दिसां आपुली भेटि जाली |
विदेहीपणें सर्व काया निवाली || २०१ ||
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें |
परी अंतरीं पाहिजे येत्न केले |
सदा श्रवणें पाविजे निश्र्चयासी |
धरीं सज्जनसंगती धन्य होती || २०२ ||
मना सर्वही संग सोडूनि द्दावा |
अती आदरें सज्जनाचा धरावा |
जयाचेनि संगें महां दु:ख भंगे |
जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे || २०३ ||
मना संग हा सर्व संगास तोडी |
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
मना संग हा साधकां शीघ्र सोडी |
मना संग हा व्दैत निशेष मोडी || २०४ ||
मनाचीं शतें ऐकतां दोष जाती |
मतीमंद ते साधना योग्य होती |
चढें ज्ञान वैराग्य सामथ्यें आंगीं |
म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति भोगी || २०५ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
____________________________________
मनाचे श्लोक
ऑगस्ट 3, 2012
प्रतिक्रिया व्यक्त करा