माझी लेखन प्रेरणा आई आणि आकाशवाणी
माझ्या लेखन प्रेरणेचा खरा ऊर्जास्त्रोत माझी आई आहे.
माझी आई सौ. भारती कुळकर्णी माझ्या जन्माच्याही
आधीपासून लेखन करत आली आहे. लेख,
कथा, कविता, स्फूट लेखन ती लिहित असते.
तिचा लेखनाचा गुण
माझ्यात आहे असं आवर्जून नमूद करतो.
मला आठवतं मी 1990 मध्ये प्रताप कॉलेज अमळनेरला बीएच्या
पहिल्या वर्षाला होतो.
त्यावेळी कॉलेजमध्ये जळगाव आकाशवाणी केंद्राचे
काही अधिकारी आले होते. त्यांनी युवा
लेखक, कविंना आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमासाठी
लेखन करावे असे आवाहन केले होते. त्यानुसार मी त्याग
ही लघुकथा लिहिली. लेखाची वा कथेची
पहिली वाचक आईच असते.
तिने माझी पहिली कथा वाचली काही दुरुस्त्या
सूचविल्या. विशेष महत्त्वाचं म्हणजे
ही कथा मी आकाशवाणी श्राव्य माध्यमासाठी लिहितो आहे
हे ध्यानात घेऊन
ग्रंथ वा पुस्तकी भाषा तसंच बोलीभाषा यात खूप फरक असतो.
आकाशवाणीच्या लेखनासाठी बोलीभाषेतून लेखन
हवं असं तिने सांगितलं. मी संपूर्ण कथा बोलीभाषेतून लिहिली
आणि ती युववाणीच्या अक्षरवेलसाठी मंजूर झाली
. नोव्हेंबर 1990 ला माझी पहिली कथा प्रसारीत झाली.
माझी जन्मदात्री आणि आकाशवाणी माझी लेखन प्रेरणा
म्हणता येईल…
महाविद्यालयात असताना मिलिंद कुळकर्णी यांचे
लोकमतमध्ये कॉलेजच्या बातम्या संकलन असलेलं
‘महाविद्यालयाच्या परिसरातून’ हे सदर चालवायचे.
त्यात कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी बातम्या पाठवित असे.
लेखन माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनत चाललं होतं.
1995 ला नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो.
कमवा आणि शिका या नुसार दैनिकातू उपसंपादक म्हणून काम करू लागलो.
हाच व्यवसाय पुढे करायचा आणि
लेखन हेच करियर बनलं. नाशिकला असताना
सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ
साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या संपर्कात आलो.
त्यांच्याकडून शिकायला मिळाले. जळगाव तरुण भारतचा
उद्घाटन विशेषांक वसंतराव कानेटकर सरांच्याहस्ते
प्रकाशन करण्याचं व्यवस्थापनानं ठरवलं. अमळनेरचा
रहिवासी असल्यानं जळगाव आणि
नाशिक तरूण भारत आणि वसंतराव कानेटकर साहेब
यांच्या समन्वयाचं काम
माझ्याकडे आलं. त्यांच्यासोबत जळगावचा प्रवास
म्हणजे साहित्यिक मेजवानीच म्हणता येईल.
जळगाव येथे 1997 ला आल्यावर जळगावची पत्रकारिता अनुभवली.
येथे महानोर दादा, भालचंद्र नेमाडे दादा
यांच्याशी संपर्कात आलो…
तरुण भारत, गावकरी पेपरमध्ये पत्रकारिता केली… 2001 मध्ये
जैन इरिगेशनच्या
प्रसिद्धी विभागात संधी मिळाली.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष
मा. भवरलालजी जैन यांच्या संपर्कात आलो.
त्यांचे लेखन कौशल्य होतेच. आजची समाज रचना…
हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याशी लेखक म्हणून
देखील अनेकदा चर्चा व्हायच्या.
दरम्यान ज्यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली अशा जोडप्यांची माहिती असलेलं
अर्धशतकी लग्नगाठ वर्षभर चालविलं.
त्याचं ‘अर्धशतकी लग्नगाठ’ हे पुस्तक जैन इरिगेशनचे
अध्यक्ष अशोकभाऊ
जैन यांच्या प्रेरणेने झालं. लेखक म्हणून बिरुदावली लागली.
‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडावा सुंदर अक्षर’,
‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ 12 डिसेंबर 2018 ला
‘आमची आई’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसिद्ध प्रकाशन
संस्था ग्रंथालीने ते प्रकाशित केले…
असे पाहता पाहता सहा पुस्तकं नावे झाले…
शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय घेऊन
या जन्मावर चित्रपटाचं पटकथा लेखनही केलं. या कार्याचा मला
आनंदच आहे.