आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 5, 2012

करुणाष्टके (मराठी)

|| श्रीहरि ||

श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

करुणाष्टके (मराठी)

६ : बुध्दि दे रघुनायका

युक्ति नाहीं बुध्दि नाहीं विद्दा नाहीं विवंचिता | नेणता भक्त मीं तुझा बुध्दि दे रघुनायका || १ ||
मन हे आवरेना कीं वासना वावरे सदा | कल्पना धावतें सैरा बुद्धि दे रघुनायका || २ ||
अन्न नाहीं वस्त्र नाहीं सौख्य नाहीं जनांमध्ये | आश्रयो पाहतां नाहीं बुध्दि दे रघुनायका || ३ ||
बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना बहु मी पीडिलों लोकीं बुध्दि दे रघुनायका || ४ ||
तुझा मीं टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी | सौख्य तें पाहतां नाहीं बुध्दि दे रघुनायका || ५ ||
नेटकें लिहितां येना वाचितां चुकतों सदा | अर्थ तो सांगतां येना बुध्दि दे रघुनायका || ६ ||
प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना | मैत्रिकी राखितां येना बुध्दि दे रघुनायका || ७ ||
कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु | प्रत्यहीं पोट सोडीना बुध्दि दे रघुनायका || ८ ||
संसार नेटका नाहीं उव्देगू वाटतो जिवीं | परमार्थु कळेना कीं बुद्धी दे रघुनायका || ९ ||
देईना पुर्विना कोणी उगेचि जन हासती | विसरू पडतो पोटीं बुध्दि दे रघुनायका || १० ||
पिशुनें वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे | समर्था तूं दयासिंधु बुध्दि दे रघुनायका || ११ ||
उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे | तूं भक्तवत्सला रामा बुध्दि दे रघुनायका || १२ ||
काया -वाचा – मनोभावें मीं म्हणवीतसें | हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघुनायका || १३ ||
सोडवील्या देवकोटी भूभार फेडिता बळें | आश्रयो मोठा बुध्दि दे रघुनायका || १४ ||
उदंड भक्त तुम्हाला आम्हांला कोण पुसतें | ब्रीद हे राखणें आधीं बुध्दि दे रघुनायका || १५ ||
उदंड ऐकिली कीर्ति पतितपावना प्रभो | मी एक रंक दुर्बुध्दि बुध्दि दे रघुनायका || १६ ||
आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं | आणिक नलगे कांही बुद्धि दे रघुनायका || १७ ||
रामदास म्हणे माझा संसार तुज लागला | संशयो पोटीं बुद्धि दे रघुनायका || १८ ||

_______________________________